<
जामनेर – (बाळु वाघ) -शहरापासून तीन कि.मी. अंतरावर भुसावळ रोडवरील नवीन एमआयडीसी भागात आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास संजय प्रभाकर चव्हाण (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दगडाने डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. एका विवाहित प्रौढ कंडक्टरशी समलिंगी व अनैसर्गिक संबंधातून या तरुणाचा खून झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. दरम्यान घटनास्थळी डीवायएसपी ईश्वर कातकडे, पो.नि. प्रतापराव इंगळे यांनी भेट दिली. जळगाव येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ठसेतज्ज्ञांनाही बोलविण्यात आले, त्यांनी विविध तपासणी केली. घटनास्थळी पोलिसांना एक मोटारसायकल आढळून आली असून त्यांनी ती ताब्यात घेतली आहे.
मोटारसायकल ही त्या कंडक्टरची असल्याचे वृत्त असून पोलिसांनी त्या कंडक्टरचा शोध घेणे सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरातील बजरंगपुरा भागात राहणारा संजय प्रभाकर चव्हाण (वय २८) या अविवाहित तरुणाचा मृतदेह भुसावळ रोडवरील नवीन एमआयडीसी भागात रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनास्थळी त्याचे डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत होते. बाजूलाच रक्ताने भरून पडलेल्या विटा व दगड आढळून आल्याने दगड विटानेच त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस व कपाळावर घाव घालून त्याचा खून केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळाच्या १५० फूट अंतरावर एक महादेवाचे मंदिर असून मंदिराच्या मागच्या बाजूस हा कंडक्टर याच मोटरसायकलवर उभा असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कंडक्टर त्याठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून या तरुणाचे व त्याचे समलिंगी व अनैसर्गिक संबंध असल्याचे वृत्त असून या संबंधातून या तरूणाचा खून झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मोटरसायकलच्या आधारे या संशयित कन्डक्टरला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या गावी जाऊन त्याचा शोध घेतल्याचे समजते.
मात्र तो आढळून आला नसल्याने त्यांना माघारी परतावे लागल्याचे वृत्त आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सपोनि विकास पाटील व पोलीस पथक याबाबत कसून तपास करीत आहेत. याच परिसरात सायंकाळी एक क्रूझर गाडी ऊभी असल्याचे वृत्त असून खून करणारा एकटा होता की अजून त्याचे सोबत जोडीदार होते? नेमका खूनाचे कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न अनूत्तरीत असून पोलीस तपासात अजून काय निष्पन्न होते? याकडे आता सार्यांचे लक्ष लागून आहे.