<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – शासनामान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर येथे श्री. अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून पाच हजार रुपये किंमतीचे 5 कापुस बियाणे पाकिटे जप्त केली आहे.
याबाबत मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर चे मालक श्री जितेंद्र दिनकर पाटील, अमळनेर यांचेविरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 नुसार अंमळनेर पोलीस स्टेशन येथे 227/2021 दिनांक 18 मे, 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्यांचा बियाणे परवाना 25 मे, 2021 पासुन कायमस्वरुपी रद्द केला आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
एचटीबीटी या अवैध कापूस बियाणापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम 2021 मध्ये कोणत्याही परिस्थितील शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषि विभागाच्या दुरध्वनी क्रमांक. 0257-2239054 वर माहिती द्यावी, असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.