<
जळगाव – (प्रतिनिधी) – पन्नास वर्षांवरील महिला पुरुष होमगार्ड जवानांना कोरोना संसर्गाची बाधा होऊ शकतो असा कयास बांधून त्यांना कोणताही बंदोबस्त देऊ नये असे आदेश राज्याचे होमगार्ड महासमादेशक यांनी काढलेले आहे.यामुळे शारीरिक पात्रता चाचणी यशस्वी ठरलेल्या वर्षावरील होमगार्ड जवानांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना पूर्ववत बंदोबस्त मिळावा या मागणीकरिता बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राज्याचे तत्कालीन होमगार्ड महासमादेशक श्री. संजय पांडे यांनी पकोरुना काळात पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड स्त्री-पुरुष जवानांना बंदोबस्त देऊ नये असे अन्यायकारक आदेश काढलेले आहेत. वास्तविक कोरोनाची बाधा कोणतेही वय पाहून होत नाही. तसे असते तर अनेक बालके, तरुणांना कोरोनाची बाधा झाली नसती. तसेच अनेक शासकीय कार्यालयांमधील तसेच पोलीस विभागातील ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन त्यांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे कोरोना हा पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांना होऊ शकतो असा निव्वळ अंदाज बांधून त्यांना बंदोबस्त पासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. बंदोबस्त मिळत नसल्याने पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांवर उपासमारीची पाळी येऊन त्यांना रोजंदारी देखील पुढे लागलेल्या संचार बंदीने मिळत नाही. होमगार्ड जवानांनी आतापर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलास सहकार्य केलेले असून २६/११ च्या हल्ल्यात तसेच नक्षलवादी भागातदेखील स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता होमगार्ड जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे.
या सर्वांकडे दुर्लक्ष करून केवळ पन्नास वर्षे उलटली यामुळे त्यांना कोरोना होऊ शकतो असे कारण सांगून होमगार्ड जवानांना बंदोबस्त पासून दूर ठेवणे त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच ५० वर्ष उलटलेल्या महिला पुरुष होमगार्ड जवानांची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत अनेक पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांनी यश संपादन केलेले आहे. यामुळे शारीरिक क्षमता चांगली असूनही केवळ पन्नास वर्षांचे वय उलटली याचे कारण सांगून त्यांना बंदोबस्त पासून दूर ठेवणे अन्यायकारक आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक शहराध्यक्ष निलेश बोरा, संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे, महाराष्ट्र स्टूडेंट युनियनचे अॅड. अभिजीत रंधे, मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सहभाग घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.