<
मुंबई, दि. 3 : गेल्या काही वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्ग-3 आणि वर्ग-4 पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत. अशा कंत्राटी कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वर्ग-3 आणि वर्ग-4 पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार प्रा.जयंत आजगावकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, गेले अनेक वर्ष वर्ग-३ आणि वर्ग-४ पदावर अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आता करण्यात येणाऱ्या भरती दरम्यान या कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल का, याबाबत शक्यता तपासून घेण्यात यावी. कारण यापूर्वी सुद्धा वित्त विभागाकडे याबाबत अभिप्राय मागविण्यात आले होते.
कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून खबरदारी म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अधिष्ठाता यांनी मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी केले.