<
जळगाव, दि.७ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने शिथीलता दिली असून लेव्हल वन अंतर्गत जळगावात संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संभाव्य धोका, तिसरी लाट रोखण्यासाठी व पुढील लॉकडाउन टाळण्यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललित बरडीया यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश पारित करून जळगावातील जवळपास सर्व आस्थापना खुल्या करण्याची परवानगी दिलेली आहे. निर्बंध शिथील झाले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पुढील काळात दुकाने नियमितपणे सुरू राहणार असून नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे निर्देश शासनाने दिले आहे. आज बाजारातील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांकडून या त्रिसूत्रीचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले. व्यापारी व नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि आपल्याला पुढील त्रास होऊ नये यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रत्येकाने व्यवसाय करावे तसेच नागरिकांनी देखील गर्दी करू नये. शक्यतो एकट्याने जावे आणि लहान मुलांना बाजारात घेऊन जाऊ नये असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
येणाऱ्या काळात पुन्हा लॉकडाऊन लागू नये यासाठी सर्वांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. आपण नियम पाळले नाही तर आपण लेव्हल १ मधून बाहेर पडू परिणामी शासन निर्बंध अधिक कडक करतील व त्याचा सर्वांना आर्थिक फटका बसेल. जिल्ह्यातील प्रत्येक व्यापारी हा नियमाने बांधलेला असून त्यांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. नागरिकांनी देखील व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, जेणेकरून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. आपले जळगाव कोरोनामुक्त कसे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.