<
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंसह जिल्हा सरकारी वकिलांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची भेट
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हा न्यायालयाला नवीन जागेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून बारगळला आहे. याबाबत आज मंगळवारी मुंबईत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हा सरकारी वकील यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली.
मंत्री यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चा होऊन येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासाठी नवीन जागेचा विषय मार्गी लागेल असे आश्वासन चर्चेदरम्यान शिंदे यांनी दिले आहे. अशी माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिली आहे.
जिल्हा न्यायालय ज्या जागेत आहे त्याठिकाणी वकील बांधवांना अनेक अडचणी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाला शाहू नगर जवळील ट्राफिक गार्डन येथे नवीन जागा मिळावी यासाठी जिल्हा न्यायालयासह जळगाव महापालिकेकडून मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मात्र ट्रॅफिक गार्डनची जागा ही जिल्हा पोलिस दलाची असल्याने पोलिस दलाने ही जागा जिल्हा न्यायालयाला देण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. मात्र यानंतरही जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्यासह जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड संजय राणे व जळगाव महापालिकेमार्फत पाठपुरावा सुरू आहे.
जिल्हा न्यायालयाला जळगाव शहरातील ट्राफिक गार्डनची जागा मिळावी यासाठी आज मंगळवारी मुंबई येथील मलबार हिल येथील निवासस्थानी नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके तसेच जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड संजय राणे यांनी भेट घेतली.
जिल्हा न्यायालय सद्यस्थितीत ज्या जागेत आहे त्याठिकाणी पुरेशा जागेअभावी वकील बांधवांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री शिंदे यांना जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सांगितले. तसेच नवीन जागा म्हणुन ट्राफिक गार्डनचा प्रस्ताव आपल्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास लवकर मंजुरी द्यावी असे साकडे ज्येष्ठ नेते खडसे यांच्यासह जिल्हा सरकारी वकील यांनी मंत्री शिंदे यांना घातले.
मंत्री शिंदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सदर प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी ठेवा असे आदेश दिले. तसेच जिल्हा न्यायालयाला लवकरच नवीन जागेसाठी मंजुरी मिळेल असे आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्यासह जिल्हा सरकारी वकील व जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. संजय राणे यांना दिले. नगरविकास मंत्र्यांच्या भेटीसह सकारात्मक चर्चेमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा न्यायालयाच्या नवीन जागेचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड केतन ढाके यांनी दिली आहे.