<
जिद्द, चिकाटी, काहीतरी नविन करण्याचे ध्येय, काहीतरी नविन विचार करण्याची कल्पनाशक्ती, काहीच नसताना सर्वकाही मिळविण्याची धमक, शिक्षकाचा असाही एक नवापैलू याचे सर्वोत्तम उदाहरणं म्हणजे आता सद्या रिलीज झालेला ‘सुपर 30’ चित्रपट. सामाजिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करतांना आलेल्या अनेक अडचणी याचे वास्तवीक जीवन या चित्रपाटातून बघायला मिळतो. ही एक फक्त चित्रपटाची कहाणी नसून ही एक सत्य कहाणी समाजात घडलेली कहाणी आहे. आनंद नावाच्या ‘व्यक्तीची-शिक्षकाची’ स्वतःची स्वप्न आपल्या आप्तेष्टांची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते. पण अशा फारच थोड्या व्यक्ती असतात. ज्या गरीब आणि निराधार मुलांची स्वप्न पूर्ण करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवतात. कोणी स्वतःच आरामातलं जीवन दुसऱ्यासाठी त्यागच कस करू शकतो. या गोष्टीवर विश्वासच पटत नाही. पण अशा काही लोकांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात आल्या की वाटत खरं अजूनही ‘बिकट परिस्थितीला नामविणारे लोक आहेत. आणि अशा लोकांचे कार्य बघितल्यावर मनात एक अभिमानास्पद शब्द तोंडावर येतात “मेरा भारत महान”.
‘सुपर 30’ म्हणजे नेमके काय आहे. हे जाणून घेतल्या शिवाय आनंद कुमार कोण आहेत याचा उलगडा होणार नाही. पाटणा बिहार मध्ये जन्मलेले आणि तिथेच लहानाचे मोठे झालेले आनंद कुमार हे अशाच व्यक्तीमधील एक आहेत. आज जगाला आनंदकुमार यांची ओळख ‘सुपर 30’ संस्थेचे संस्थापक म्हणून आहे. ते भारतीय गणितज्ञ असून हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकविण्याचा उपक्रम बिहारमध्ये ‘सुपर 30’ या नावाने ते चालवितात. 1992 साली आनंदकुमार यांनी रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिकस ही संस्था सुरु केली. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून 30 विद्यार्थ्यांची निवड केली जाते व त्यांना आय आय टी प्रवेश व इतर अनेक परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्या या गणित वर्गावर एक तासाचा कार्यक्रम घेतला होता. आनंद कुमार यांचे गणितातील शोध निबंध ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम’ व ‘मॅथेमॅटिकल गॅझेट’ या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. आनंदकुमार हे लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र होते. त्यांनी लहानपणापासूनच स्वतःच्या कौशल्याचा विकास करायला सुरुवात केली होती. ज्यावेळी एक मुलगा एक का दोन उत्त्तरे देई तोपर्यंत आनंद कुमार सर्व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे एकदम सहजपणे सोडवायचे. कठीणातील कठीण गणिताचे उदाहरणं पण ते कमी वेळेत सोडवायचे. याचं हुशारीमुळे त्यांना गणित हा विषय आवडायला लागला होता. अशाच आवडीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आता आयुष्यात असं काही तरी घडेल व संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल हे त्यांना अजिबात उमगले नव्हते आणि तो दिवस उगवलाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सर्वच इच्छा आकांशा बाजूला सारत कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांनी घरातच एक छोटासा व्यवसाय सुरु केला. तो म्हणजे पापड बनवणे व विकणे. संध्याकाळी आईला पापड विकण्यात ते मदत करू लागले. आयुष्य असच जात होत. सर्व इच्छा आकांशा मनात मारत कसं तरी आयुष्य काढत आनंद कुमार जगत होते. पण नशिबाला काहीतरी वेगळंच अभिप्रेत होत. आणि आयुष्याने कलाटणी घेतली. 1992 साली त्यांनी एक खोली 500 रुपये भाड्याने घेऊन मुलांना गणित शिकवायला सुरु केली. ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिकस’ नावाची स्वतःची कोचिंग सेंटर सुरु केलं. सुरुवातीला फक्त 2 मुलांवर सुरुवात करून एकच वर्षात हा आकडा 36 पर्यंत आला. पुढे तीन वर्षात हाच आकडा पाचशेपेक्षा जास्तवर जाऊन ठेपला. आता वेळ होती ती आयुष्यातील अचानक घेतलेल्या वळणाची. वळण होत ते ‘सुपर 30’ कडे वळण्याचं. 2002 साली एक अत्यंत गरीब मुलगा त्यांच्या जवळ आला. त्याची खूपच गरिबीची परिस्थिती असल्याने तो आय आय टी परीक्षा देऊ शकत नव्हता. त्याच मुलापासून प्रेरणा घेत आनंदकुमार यांनी ‘सुपर 30’ ही नविन मोहीम हाती घेतली. या सुपर 30 मध्ये प्रत्येक वर्षी तीस गरीब मुलांना आय आय टी चे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात होते. या तीस मुलांचे रोजचे जेवण त्यांची आई बनवत असे. या मुलांना पूर्ण वर्ष हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी दिले जात होते. जून 2016 मध्ये त्यांच्या जीवनावरील पुस्तक बिहार येथे प्रकाशित केले गेले. त्यांना भारत सरकारकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले गेले. अशा या शिक्षकाचे आनंद कुमारचे कार्य बघितले तर असं वाटत एक काल्पनिक कथाच आहे की काय पण तसं नाहीय ही एक सत्य घडलेली गोष्ट आहे. आजही या भारतवर्षात कितीतरी आनंद कुमार आपल्या संघर्षात आपली कहाणी आपल्या मेहनतीच्या शाहीने लिहिण्यात व काहीतरी नविन या देशाला देण्यात व्यस्थ आहेत. हे सर्व बघितल्यावर नक्कीच मनात शब्द फुटतात ‘Its my incredible India’
– मनोज भालेराव(शिक्षक)-प्रगती विद्यामंदिर,जळगाव (मो नं. 8421465561)