<
जळगाव- केंद्र शासनामार्फत देशातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय) सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
या योजनेसाठी भु-अभिलेखानुसार ज्या शेतक-यांच्या नावे 2 हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे शेतकरी पात्र आहेत. ही योजना ऐच्छिक व अशंदायी पेन्शन योजना आहे. शेतक-यांनी त्यांच्या 1 ऑगस्ट, 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रुपये 55/- ते दोनशे रुपये याप्रमाणे वयाच्या 60 वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतक-ऱ्यांच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या योजनेत सहभागी शेतक-यांना 60 वर्षे वयानंतर मासिक रक्कम रुपये तीन हजार पेन्शन मिळणार आहे.
या योजनेतंर्गत शेतक-यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) http//www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये 30/- सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे. असे आवाहन श्री. ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.