<
जळगाव दि. ७ : जैन इरिगेशनचा परिसर म्हणजे पर्यावरण आणि विकासाचा संगम असल्याचे निरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात अनुलोम संस्थेच्या आज झालेल्या तिसऱ्या वार्षिक बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते.
अनुलोम संस्थेच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आगमन जैन हिल्स परिसरात झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जैन हिल्स येथील सुंदर अशा परिसरात उभारण्यात आलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वैशिष्ट्येपूर्ण वास्तूचे त्यांनी अवलोकन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांबद्दल जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. तसेच त्यांनी कंपनीच्या कामाकाजाबद्दल, भविष्यातील प्रकल्पाबद्दलची माहिती जाणून घेतली. यापूर्वी दिलेल्या भेटीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी जैन हिल्स परिसराची रचना, बांधणी आणि पर्यावरणाची जपणूक भावणारे असल्याचे स्पष्ट केले होते.