<
बोलणं अडखळल्यागत होतं;
अन् थांबतो:
होतो अंतर्मुख…
पुढचं नसतं बोलण्यासारखं:
अभद्र आहे, असं नाही-
कदाचित्, असू शकतं अप्रिय…
कबुली द्यायची असते;
पण होत नाही धाडस.
साशंक आहे, म्हणून म्हणत नाही.
प्रेम: हो, प्रेमाची कबुली…
ती करीत असावी, उत्कट;
कदाचित्, कुणी सांगावं, नसेलही तसं.
आम्ही मित्र आहोत:
एकमेकांस शेअर करणारे…
मग आजच असं का होतंय्?
एकत्र उठणं-बसणं, टाळ्या देणं;
अर्धा घास राखून ठेवतो:
उष्ट्यानंच पित राहतो-
पाणी-पेयादी…
बिनदिक्कत ओढणीला हात पुसतो.
बोलतो प्रेमावर मनमुराद:
(आताशा अडखळू लागलोय्.)
गरज आणि गरजेसंबंधी…
प्रेम: शरीरापलीकडं असतं काय?
की शरीर जमेत धरून केलं जातं:
समाजाकडून असलेल्या अपेक्षा…
का नाक मुरडतो?
निषिध्द मानतो…
ऐकून आहोत:
आख्यायिका अजोड कहाण्या…
विफल प्रेमाच्या!
करतो चर्चा: दुभंगतो…
कळत नाही-
प्रेमाला विरोध का?
प्रेम का ठरविलं ज़ातं प्रतिष्ठाहीन?
प्रेमात सेक्स अपरिहार्य असतो का?
कुठल्याच प्रेम-कहाणीत असा आढळ नाही.
प्रेमी बेभान होऊन काय करीत होते?
आम्ही होतो कुंठित.
मिळत नाही उत्तर: उत्तरोत्तर…
निरुत्तर.
आम्ही सेक्सशी येऊन थांबतो;
चाचपू लागतो, स्वत:ला…ते असावं काय अनिवार्य?