<
‘गोलाणी’तील तळमजल्यात साचलेल्या सांडपाण्याचा निचरा जीव धोक्यात घालून केल्याची घेतली दखल
जळगाव, ता. 21: शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि ठिकठिकाणी साचणारे कचरा, फुले, भाजीपाल्याच्या घाणीचे ढीग ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली होती. यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जात होत्या. मात्र, हा प्रश्न कायमच होता. या अनुषंगाने शुक्रवारी, दि. 18 जून 2021 रोजी वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिद्ध केले.
त्याची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर संबंधित अधिकार्यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तेथे आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालत कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला.
दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेशही दिले होते. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी आरोग्य निरीक्षक श्री.रमेश कांबळे, सफाई कामगार श्री.बबलू गायकवाड, श्री.रणजित सनकत, श्री.परभत नाडे, श्री.रोहित सारसर, श्री.विजय नाडे, श्री.आनंद सपकाळे, श्री.गफ्फार सय्यद, श्री.सतीश पवार, श्री.उमेश बेडपाल, श्री. भगवान डाबोरे या कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याची व अथक परिश्रमाची गंभीरपणे दखल घेऊन आज, दि. 21 जून 2021 रोजी संबंधित सर्व कर्मचार्यांना महापौर दालनात बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी यापुढेही सतत आपणाकडून अशाच पद्धतीचे काम अपेक्षित असल्याचे सांगत संबंधित कर्मचार्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. त्यावर आजपर्यंत अशा पद्धतीने कधीच आमच्या कामाची दखल घेतली गेली नाही. मात्र, तुम्ही महापौर, उपमहापौर झाल्यानंतर आमच्या कामाची दखल घेतली, याचे आम्हाला समाधान असल्याची भावना यावेळी संबंधित कर्मचार्यांनी व्यक्त केली. नगरसेवक श्री.किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त पवन पाटील याप्रसंगी उपस्थित होते.