<
जळगाव : मिळालेल्या सत्ता, पैसा, पदाचा वापर गरिबांसाठी करता आला नाही तर तो ते वैभव काहीच कामाचे नाही. मिळालेल्या अधिकाराचा, पैशांचा, जनतेच्या विकासासाठी वापर झाला पाहिजे. सामाजिक योगदान वाढले पाहिजे, असा संदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्य कृतीतून दिला, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती सांगत, देशातील अनेक राजांपैकी छत्रपती शाहू महाराज असे राजे होते की, त्यांनी जनतेसाठी विकासाची कामे केली. ते आरक्षणाचे जनक होते. त्यांनी कोल्हापूर ते मिरज रेल्वे लाईन सुरू केली. त्यांच्या नावाने उत्तरप्रदेशात विद्यापीठ आणि जिल्हा आहे. त्यांचे योगदान सर्वसामान्य जनतेसाठी अमूल्य आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. इम्रान तेली, डॉ. जितेंद्र भगत, डॉ. पंकज ताठे, कर्मचारी बाळासाहेब गुंडाळे, ज्ञानेश्वर डहाके, प्रभाकर पाटील, युवराज सुरवाडे, लिलाधर कोळी, दगडू भारसके, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.