<
जळगाव (प्रतिनिधी) समाजात असे खूप लोक आहेत की, ज्यांना चांगल्या कामांना मदत करायची इच्छा असते. मात्र जेथे आपण मदत करणार आहोत ते काम किती समाजोपयोगी आहे आणि त्याच्याशी कुठली संस्था आणि लोक जुळलेले आहेत याची त्यांना खात्री हवी असते. अशी एकदा खात्री पटली की मग असे लोक आपल्या औदार्याचा हात कधीच आखडता घेत नाही.
येथे तर सर्वजण केवळ सेवाभाव आणि निरपेक्षपणे काम करीत आहेत. कुठलीही लाभाची अपेक्षा न करता काम करणाऱ्या अशा व्यक्ती आणि संस्थांसाठी समाजाने उदार अंतःकरणाने सहकार्य करावे. कारण औदार्याचे जल वाहते असणे आवश्यक असते. त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी घडून येऊ शकतात. गतिमंद मुलांचा सांभाळ करणं हे जन्मदात्या आई वडीलांना सुद्धा फार कठीण जातं, परंतु अशा परिस्थित आश्रय मार्फत अशा अनेक मुलांचा सांभाळ केला जातो आणि ही गोष्ट दैवी कार्यापेक्षा कमी नाही.
म्हणून अशा दैवी कार्यात समाजातील सर्व घटकांनी आपलं मोलाचं सहकार्य करणं गरजेच आहे, ज्यातून असे प्रकल्प साकारणाऱ्या मंडळींना नवी ऊर्जा मिळेल व प्रकल्पाचा विस्तार होऊन समाजातल्या अनेक गतिमंद प्रवर्गाला याठिकाणी हक्काचे घर मिळेल. अशी भावना राज्याचे नागरी स्वच्छता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आश्रय मध्ये लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त करून समाजाला आवाहनही केले.
सद्यस्थितीत १८ वर्षांवरील गतिमंद व विकलांग मुलांसाठी कुठलीही शासकीय योजना अस्तित्वात नाही. परंतु भविष्यात ह्या वर्गासाठी शासकीय योजना कशा राबविता येतील यासाठीचा विषय आम्ही चर्चेस घेणार असल्याचे सांगितले.
आईच्या नावाने दोन लाखाची देणगी जाहीर
आपल्या आईंच्या नावाने त्यांनी आश्रयला दोन लाख एक रुपयांची मदत घोषित करून आपण केवळ बोलत नाही तर कृतिशीलही आहोत हे दाखवत त्याचा प्रत्ययही आणून दिला.
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट यांच्या माध्यमातून व स्टार कुलर्स व कंडेन्सर्स यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या सोलर पॅनेल चा लोकार्पण सोहळा आज सावखेडा शिवारातील प्रौढ मतिमंदासाठी आजन्म काम करणाऱ्या आश्रय माझे घर येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उद्योजक सुशील असोपा, रोटरी क्लब जळगाव ईस्ट चे अध्यक्ष भावेश शहा, आश्रय चे अध्यक्ष डॉ प्रताप जाधव, प्रोजेक्ट चेअरमन संजय शहा उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात केशवस्मृती चे अध्यक्ष भरत अमळकर यांनी रोटरी क्लब सदस्य व सुशिल असोपा यांचे आभार मानत केशवस्मृती प्रतिष्ठान सामाजिक क्षेत्रात ज्या क्षेत्रात कोणी नाही त्याठिकाणी सेवा कार्य करत असून आश्रय माझे घर हा प्रकल्प याच भावनेतून सुरु झाला असल्याचे सांगत आज जळगाव जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त प्रौढ मतीमंद मुल असून त्यांच्या पालकाचे समुपदेशन करून हे मुल आश्रय मध्ये आणण्यास तयार असून रोटरीने त्यामध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मातोश्री आनंदाश्रम येथे ओपन जिम साहित्याचे लोकार्पण
मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे जिल्हा नियोजन निधीतून मंजूर झालेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.
जिल्हा नियोजन व विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रु. १० लक्ष किमतीचे ओपन जिम साहित्य मातोश्री आनंदाश्रमातील वृद्धांसाठी प्राप्त झाले होते. जिल्हा नियोजन व विकास निधीतून स्वतंत्र ट्रान्स्फार्मर मातोश्री आनंदाश्रामास प्राप्त झाले त्याचा देखील लोकार्पण सोहळा आज पार पडला.
आश्रय माझे घर ला सातत्याने निस्वार्थ वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुशिल गुजर, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, डॉ महेश बिर्ला व त्यांचे सहकारी यांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लबच्या सहयोगाबद्दल वर्धमान भंडारी, हितेश्वर मोतीरामानी, स्वप्निल जाखेटे, कोरोना काळात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. रितेश पाटील व सेवारथ परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रोटरी क्लबच्या माजी गवर्नर अपर्णा मकासरे, हितेश मोतीरामानी यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रताप जाधव, आभार प्रदर्शन रेखा पाटील यांनी तर सूत्रसंचालन संगिता अट्रावलकर यांनी केले. कार्यक्रमास केशवस्मृती परिवारातील व रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी आश्रय माझे घर, मातोश्री आनंदाश्रम, विवेकानंद प्रतिष्ठान निवासी शाळाच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.