<
कार्यक्रमाचे ऑनलाईन उदघाटन, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश
जळगाव : महाराष्ट्र राज्य निरोगी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाची भूमिका बजाविणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेवून वैद्यकीय सेवा करण्यासाठी इच्छूक तरुण-तरुणींचे कौतुक आहे. यामुळे रोजगार निर्मित्ती वाढून मनुष्यबळ तयार होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवार, ८ जुलै रोजी दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन प्रणालीने उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेले जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सहभागी झाले होते. उदघाटनावेळी प्रामुख्याने अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, कौशल्य विकास अधिकारी एम.बी.देशपांडे उपस्थित होते.
उदघाटनाच्या आधी अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रस्तावनामध्ये एम.बी.देशपांडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी मनोगत व्यक्त केले. तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासह रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्नदेखील सुटणार आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकून स्वत:साठी व रुग्णसेवेसाठी स्वत:ला तयार करा, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.
यानंतर राज्यस्तरीय उदघाटनाचा कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातील राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रस्तावना केली. त्या ते म्हणाले की, राज्यामध्ये कोरोना महामारीमुळे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रांमध्ये साथीच्या रोगांशी संबंधित उदभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध् व्हावे यासह या क्षेत्रात असणा-या संसाधनामधील प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यासह इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थ केअर, मेडिकल व नर्सिंग आदी क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध् करुन देण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन केले. यानंतर मनोगत व्यक्त केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची निवड झाली आहे. याअंतर्गत जनरल डयुटी असिस्टंट हा ३० विद्यार्थी प्रवेशक्षमता असलेला पहिला अभ्यासक्रम सुरु झाला आहे.
कार्यक्रमावेळी रुग्णालयातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ.संजय बनसोडे, प्रशिक्षक तथा परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्या ए.व्ही.भालेराव, उपप्राचार्य व्ही.एच.भालेराव, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.संगिता गावीत, डॉ.श्रीकृष्ण चव्हाण, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.योगिता बावस्कर, डॉ.बाळासाहेब सुरोशे, दिलीप मोराणकर यांच्यासह कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे जिल्हा समन्वयक महेश चौधरी, दत्तात्रय रिठे यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.