<
जळगाव, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील कोविड -१९ बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असून सद्यस्थितीत कोविड १९ ची दुसरी लाट ओसरलेली असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यास हरकत नसल्याबाबत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव व जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांनी अहवाल दिलेला आहे.
सद्यस्थितीत जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने तसेच त्याठिकाणी आयसीयु सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने आयसीयु सुविधेची गरज असणाऱ्या कोविड -१९ बाधित रुग्णांकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथील आयसीयु सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील. जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव येथील आयसीयु सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर सदरचे रुग्ण त्याठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावेत. तसेच Mucormyerosis या आजाराचे रुग्णांवर उपचार करण्याकरीता पूर्वीप्रमाणेच जिल्हा सामन्य रुग्णालय, जळगाव येथील आयसीयु वार्डमध्ये उपचार सुरु रहातील.
जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्य्वस्थापन अधिनियम २००५ , भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेशान्वये कळविले आहे.