<
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रस्तावित जागा चिंचोली येथे असून मंगळवारी दि. २० जुलै रोजी बांधकामाकरिता मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने नेमलेल्या सल्लागार कंपनी एचएससीसीचे उप सामान्य व्यवस्थापक श्यामसुंदर मिढढा, मुंबई यांच्यासह अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी भेट दिली. भेटीत जागेविषयी चर्चा होऊन प्रकल्पाविषयी प्राथमिक बोलणी करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची प्रस्तावित जागा मौजे चिंचोली ता.जळगाव येथे असून तेथे भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे सुधारित प्रकल्प अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर झालेला आहे. या इमारत बांधकामासाठी राज्य शासनाने एचएससीसी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले असून त्याबाबत चाचपणी सुरु झाली आहे. प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्याकरिता या कंपनीला काही सरकारी प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. त्याकरिता कंपनी एचएससीसीचे उप सामान्य व्यवस्थापक श्यामसुंदर मिढढा हे दोन दिवस जळगावात होते. त्यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन फॉर्म घेऊन कागदपत्रांची पूर्तता पुढील दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
तसेच प्रत्यक्ष चिंचोली येथील जागा पाहणीकरिता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह श्यामसुंदर मिढढा यांनी मंगळवारी २० जुलै रोजी भेट दिली. यावेळी प्रस्तावित जागा दाखवून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. तसेच प्रकल्प पूर्ण कसा होईल, आराखडा व इमारत बांधण्याच्या अनुषंगिक बाबी याविषयी सविस्तर चर्चा केली.