<
जळगाव, दि. २२प्रतिनिधी– एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान अंगारकी चतुर्थीनिमित्त बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. दि.२७ जुलै ला अंगारका योग (मंगळकी चतुर्थी) येत आहे. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. श्री गणेशजींच्या अंगारकी चतुर्थीला खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी येथे गर्दी केली जाते. यामध्ये ग्रामीण भागासह शहरांतूनही भाविक भक्त येतात. मंगळकी चतुर्थीमुळे कटलरी, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, रसवंती, खेळणींची दुकानेही थाटली जातात. कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून पद्मालय देवस्थान शासकीय नियमानुसार गेल्या काही दिवसांपासूनच बंदच आहे त्यामुळे अंगारकी चतुर्थीला देवस्थान दर्शनासाठीसुद्धा बंदच राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नसून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदीर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.