<
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शुक्रवारी दि. २३ जुलै रोजी विद्यार्थ्याला गुरुपौर्णिमेची अनोखी भेट मिळाली. त्याला सकाळी प्रकृती खालावल्याने वॉर्ड क्र. ७ मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला अधिष्ठाता यांना भेटून वंदन करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. मात्र संध्याकाळी अचानक अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वॉर्डात जाऊन त्याची प्रकृतीची विचारपूस केली. यामुळे विद्यार्थी भारावून गेला होता.
वरद शशिकांत पाटील (वय १८) रा. विश्रामबाग, सांगली ता. मिरज जि. सांगली हा विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला प्राध्यापक व मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी गुरुपौर्णिमा असल्याने त्याला अधिष्ठाता यांचेसह इतर प्राध्यापक वर्गाला भेटून वंदन करण्याची इच्छा होती. मात्र ती अपूर्ण राहिली होती.
संध्याकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी थेट वॉर्डात जाऊन विद्यार्थी वरद याची प्रकृती कशी आहे हे विचारले. थेट ‘डीन सर’ भेटायला आल्याने विद्यार्थी भारावून गेला. यावेळी त्याच्या प्रकृतीची माहिती डॉ. उमेश जाधव यांचेकडून घेत अधिष्ठाता यांनी सूचना केल्या. यावेळी डॉ. सतीश सुरळकर , जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी उपस्थित होते.
दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना गुरुपौर्णिमा निमित्त भेटून पुष्पगुच्छ देत वंदन करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी गर्दी केली होती.त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ चा स्टुडंट कौन्सिल सदस्य डॉक्टर शुभम भोलूणे देखील भेट घेतली.