<
गांधी विचारांची अनिवार्यता का? दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन
जळगाव-(प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी अहिंसा, अस्पृश्यता, जातीय सलोखा, सामाजिक अर्थव्यवस्थेची शिकवण दिली. महात्मा गांधीजींचे हेच विचार विश्वाला शाश्वत विकासाकडे नेऊ शकतात असे सांगत आज जगभरात अहिंसातत्त्वाचे महत्त्व वाढत असल्याचे विचार प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ पद्मभूषण रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले.
जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व शिमला येथील इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हॉन्सड स्टडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21व्या शतकात आजही महात्मा गांधीजी यांच्या विचारांची अनिवार्यता का (How Gandhi Matters) या दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटक म्हणून रामचंद्र गुहा बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार, प्रो. सुधीर चंद्रा, प्रो. एम. पी. सिंग, गिता धरमपाल उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने बा-बापू150 अंतर्गत ग्रामविकासाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. गांधीजींच्या संदर्भातील अधिकृत माहिती लोकांपर्यंत जावी आणि विचारमंथन घडून यावे या उद्देशाने सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात रामचंद्र गुहा यांनी अनेक उदाहरणे देत त्यांनी महात्मा गांधीजींच्या अहिंसा, अस्पृश्यता, यात्रा आणि सामाजिक अर्थव्यवस्था यासंदर्भात पुराव्यानिशी आणि गांधीजींच्या उद्गारांसह सादरीकरण केले. महात्मा गांधीजींची प्रासंगिकता आजच्या काळातही किती उपयुक्त आहे हे पटवून दिले. ते म्हणाले, गांधीजींनी अहिंसेचे तत्त्व स्वीकारले. त्या आधी त्यांनी स्वराज्य ही संकल्पना मांडली. अहिंसेच्या तत्त्वामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतात हे त्यांनी जगाला दाखविले. याबाबतीत काही क्रांतिकारी संघटनांना अहिंसा मान्य नव्हती परंतू त्यांचे प्रेरणास्थान गांधीजी होते आणि त्यांचा उद्देश हा भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता. सत्याग्रह ही एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे ही गांधीजींची धारणा होती. हिंसा ही नेहमीच विनाशाकडे घेऊन जाते. मात्र अहिंसेला सुद्धा काही मर्यादा आहेत. कारण हिटलरच्या समोर अहिंसा कितपत उपयोगी ठरली असती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रामचंद्र गुहा पुढे म्हणाले, अस्पृश्यतेच्या प्रश्नांवरून आजही देशात खूप राजकारण केले जातेय. गांधीजींनी लिहिलेल्या हिंद स्वराजमध्ये जातीपातीला थारा दिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी यशस्वी होऊ शकले कारण त्याठिकाणी जातीय सलोखा होता, त्याचवेळी भारतात मात्र जातीय विषमता पसरली होती. तसेच जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आजही गांधीजींचे अहिंसा तत्त्व लागू होते. धर्माच्या नावाखाली गांधीजींना हिंसा कधीही मान्य नव्हती.
रामचंद्र गुहा यांनी बॅरीस्टर जिना यांचा संदर्भ देत महात्मा गांधी व काँग्रेस हे मुस्लीम विरोधी होते असे म्हटले आहे. शास्त्र आणि तंत्रज्ञानात गांधीजींचे योगदान, पर्यावरणवादी होते का? याविषयामध्ये गांधीजी समजून घेतले पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीतील औद्योगिकरणाचे भारताने अनुकरण करू नये या मताशी गांधी सहमत होते. कारण त्यांना औद्योगिकरणाच्या मर्यादा माहित होत्या. भारताचा दीर्घकालीन शाश्वत विकास व्हावा असे गांधीजींचे मत होते त्यादृष्टीने त्यांनी ग्रामिण अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. ग्रामस्वराज्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करून तशी व्यवस्था निर्माण केल्याचे दिसून येत असल्याचे गुहा म्हणाले.
सेमिनारची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले. त्यात त्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या निर्मितीमागील भवरलालजी जैन व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची भूमिका स्पष्ट केली. गांधीजींना समजण्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास करावा लागेल यासाठी कस्तुरबाचे चरित्र समजले पाहिजे असे अय्यंगार म्हणाले. प्रो. गिता धरमपाल यांनी राष्ट्रीय परिषद घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आशुतोष कुमठेकर यांनी संत तुकडोजी यांची प्रार्थना म्हटली. विद्या कृष्णामूर्ती यांनी सूत्रसंचालन केले.
दुपार सत्रात विविध विषयांवर चर्चा
गांधी जीवन आणि तत्वज्ञान कसे समजवाल, सध्याच्या शतकातील महात्मा गांधीजींचे शिक्षण विषयीचे तत्वज्ञान, सत्याग्रह, स्वदेशीबाबत पुनर्विचार आणि उत्क्रांती, स्वराज आणि सत्याग्रहाची आजच्या काळात गरज, अपयशातून शिकणे आणि पर्यायी भविष्याचा विचार या विषयी अभ्यासकांनी चर्चासत्रात आपले विचार प्रकट केले.
सुधीर चंद्रा यांचे आज मार्गदर्शन
जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचा उद्या (ता.24) ला समारोप आहे. या सत्रात प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ सुधीर चंद्रा ‘गांधीजींची प्रासंगिकता व संभावना आणि आपली जबाबदारी’ याविषयावर मार्गदर्शन करतील. तसेच सर्वधर्म समभाव आणि सामाजिक, राजकीय न्याय, भारत आणि जगासाठी व्यवहार्य उपाय, धर्म आणि सत्य या प्रश्नांवर गांधीजींच्या कल्पना, गांधीजींचा निधर्मी वाद, मानवी हक्क आणि जागतिक शांतता याविषयी गांधीजींचे विचार, गांधीजींचा शाश्वत वारशाचा सामाजिक आढावा या विषयावर विचारमंथन दिवसभरात करण्यात येणार आहे. समारोप सत्र गांधी अभ्यासकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.