<
जळगाव – ऐन तारुण्यात येतांना जी जवळची मैत्रिण असते ती आई.. ती आईच हिरावली गेल्याने दु:खी झालेल्या त्या युवतीला एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.. आणि चमत्कार बाजूच्या बेडवर आपल्या आईच्या वयाची एक गरिब स्त्री दिसली…आपली आई म्हणून तिला डोळेभरुन पाहिले आणि आणखी दु:ख झाले…. तिला चालता येत नव्हते कारण दोन्ही पाय नव्हते… रक्ताची वा नात्याची नसली तरी ही आपली मावशी नक्कीच होऊ शकते…. जे आईसाठी करायचे होते तेच व्हिलचेअर भेट देत मावशीसाठी करु या… असा तिने संकल्प केला आणि डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात फॉलोअपसाठी येतांना वृषालीने आपल्या आईची आठवण असलेली व्हिलचेअर त्या मावशीला देऊन संकल्प पुर्ण केला … माणुसकी जोपासली…
आजच्या मतलबी आणि स्वार्थी जिवनात माणूस स्वत:शिवाय इतरांचा विचार करत नाही. पण कोविडने ही परिस्थीती बदलली आहे. अजूनही माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतो. असेच माय मरो आणि मावशी जगो.. अशी म्हण सहजच बोलली जाते मात्र या म्हणीला काहीशी साजेल अशी घटना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात घडली. एका युवतीने आपल्या आईसाठी घेतलेली व्हीलचेअर आईच्या स्मरणार्थ हातमजूरी करणार्या एका गरजू दोन्ही पाय गेलेल्या महिलेला मावशी म्हणत सप्रेम भेट दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील वृषाली राजाराम झुंबाले (वय २०) ह्या युवतीच्या आईला महिनाभरापूर्वी पॅरालिसीस झाला होता, तिच्यासाठी म्हणून वडिलांसह वृषालीने नवीन व्हिलचेअर विकत घेतली मात्र काही दिवसातच आईचे छत्र हरपले, वृषालीने कसेबसे स्वत:ला सावरले तोच तिला किडनी स्टोनचा त्रास उमळला. वडिल राजाराम झुंबाळे हे तात्काळ वृषालीला घेवून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आले. येथे तज्ञ डॉक्टरांनी तपासल्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया केली.
यानंतर शस्त्रक्रिया वॉर्डात वृषालीला पुढील उपचारार्थ दाखल केले, याप्रसंगी वॉर्डात एक ४० वर्षीय महिला रुग्ण देखील दाखल झाली. तिचे दोन्ही पाय कापावे लागले होते, मोलमजूरी करणारे कुटुंब आणि त्यातच आता दोन्ही पाय गेले. हे पाहून वृषालीला खुप वाईट वाटले. घरात आपल्या आईसाठी घेतलेली व्हिलचेअर तिच्या दृष्टीसमोर आली आणि त्या रूग्णांच्या रूपात मावशी दिसली यातूनच माणुसकीच्या नात्यातून पुष्पा कश्यप नामक चाळीसवर्षीय रुग्ण महिलेला आईच्या जागी मानत महागडी व्हीलचेअर भेट देण्याचे ठरविले. दरम्यान वृषालीचा डिस्चार्ज होऊन सात दिवसानंतर फॉलोअपसाठी रुग्णालयात आली होती, त्यावेळी तिने आठवणीने व्हीलचेअर सोबत आणली आणि त्या मावशींना सप्रेम भेट दिली. तिच्या या कृतीतून समाजासाठी माय मरो मावशी जगो.. चा आदर्श निर्माण केला.