<
जळगाव, (जिमाका) दि. 30 – केंद्र शासनाच्या डॉ शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध कामांना गती देण्याबरोबर अद्याप जी कामे सुरु व्हावयाची आहेत ती कामे सर्व संबंधित यंत्रणानी तातडीने सुरु करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.
राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, डॉ शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव समुह, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गाव समुह व बोदवड तालुक्यातील ऐणगाव गावसमुहाची निवड करण्यात आली असून या समुहातील गावांमध्ये शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे आणि कृषी व कृषीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यासाठी यंत्रणांनी कामे सुचवून ती तातडीने सुरु करावी. ही कामे सुरु करतांना काही अडचणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अडचणी दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. तसेच या कामांची नोंद करुन त्यांचे जीओ टॅग करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.
या अभियानातंर्गत हरताळा गाव समुहातील सहा गावांमध्ये 342.96 कोटी रुपयांच्या 310 कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी 201 कमांची नोंद केली आहे. तर 193 कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. पातोंडा गाव समुहातील चार गावांमध्ये 97.03 कोटी रुपयांच्या 216 कामांची नोंद केली आहे. तर 95 कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. तसेच ऐनगाव गाव समुहातील चौदा गावांमध्ये 71.55 कोटी रुपयांच्या 145 कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी 46 कमांची नोंद केली असल्याची माहिती सदस्य सचिव श्री. लोखंडे यांनी बैठकीत दिली.