<
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ११ ऑगस्ट रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. दिव्यांग बांधवांची दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभला आहे. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. तसेच पुढील चार बुधवार दि. १८ व २५ ऑगस्ट आणि दि. १ व ८ सप्टेंबरचे बुकिंग कुपनदेखील आरक्षित झाले असून गुरुवारी १२ ऑगस्टपासून बुधवार दि. १५ सप्टेंबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २८ जुलै २०२१ पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. ज्या दिव्यांग बांधवानी ११ ऑगस्टचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली.
उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, वाल्मिक घुले, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.
सूचनांचे स्वागत
“दिव्यांग बोर्डात तपासणीसाठी येणाऱ्या बांधवांची दरवेळी होणारी गैरसोय पाहता बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली. त्यानुसार सलग दुसऱ्या बुधवारी आगाऊ कुपन घेऊन दिव्यांगांनी तपासणी केली. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर झाली. कुपन प्रणालीमुळे कार्यवाही करण्यासाठी देखील सोपे जात आहे. कुपन कोणत्याही दिवशी शासकीय कामकाजाच्या कालावधीत मिळत आहे. बोर्डातील कामकाजाविषयी कोणाला सूचना करायच्या असतील तर त्या स्वागतार्ह आहे.त्यावर विचार केला जाईल.”
- अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.
प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून वैद्यकीय अधीक्षक कक्षातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.
अशी आहे बुकिंग कुपन प्रणाली
दर बुधवारी २०० दिव्यांगांची तपासणी होणार आहे. दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक यांनी संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवाचे ओळखपत्र दाखवून दिव्यांग बोर्डात पडताळणी करावी. नंतर रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन प्राप्त करू शकतात. आता डोळ्यांनी दिव्यांग बांधवाना तारखेचे कुपन दाखवून नेत्रकक्ष (आय वॉर्ड) येथेच केसपेपर देखील मिळेल व वैद्यकीय तपासणीदेखील होणार आहे. तर मानसिक दिव्यांग सोडून इतर दिव्यांग असलेल्या बालकांना कूपनची आवश्यकता नाही.