<
महिलेच्या गर्भाशयातून काढला अडीच किलोचा गोळा
जळगाव : पुणे येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय महिलेला पोटात दुखत असल्याने पुणे तसेच कालांतराने कवठेमहांकाळ जि. सांगली येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखविण्यात आले. मात्र कोठेही गुण न येता त्रास मात्र कमी झाला नाही. अखेर जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सदर महिलेने तपासणी केली असता पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले. हा अडीच किलोचा गोळा काढून रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने महिलेसह तिच्या कुटुंबियांना दिलासा दिला. महिलेच्या पतीने कृतज्ञता म्हणून वॉर्डात स्टेशनरी भेट देत पेढे वाटले.
रुपाली रावसाहेब बिले (वय ४०) यांचे माहेर सांगोला जि. सोलापूर (ह.मु. पुणे) असून त्यांचे सासर सावळज ता. तासगाव जि. सांगली (ह.मु. भोसरी, पुणे) आहे. त्यांना गेल्या तीन वर्षांपासून पोट दुखते म्हणून समस्या होती. त्यांनी वेळोवेळी पुण्यात विविध डॉक्टरांना दाखविले. प्रसंगी कवठेमहांकाळ जि. सांगली येथेही उपचार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची पोटदुखी कमी होत नव्हती. त्यांचे पती रावसाहेब बिले हे टेम्पोचालक म्हणून काम करतात. परिस्थिती हलाखीची आहे.
अशातच जळगावातील एका डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी करण्याचे ठरविले. त्यानुसार रुपाली बिले ह्या २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वॉर्ड ७ मध्ये दाखल झाल्या. त्यांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता त्यांच्या गर्भाशयात अडीच किलोचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. शल्यचिकित्साशास्त्र विभागातर्फे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. उमेश जाधव आणि डॉ. स्नेहा वाडे यांनी अवघड शस्त्रक्रिया करून हा गोळा काढला. त्यानंतर डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आले.
बुधवारी ११ ऑगस्ट रोजी त्यांना यशस्वी उपचार करून रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी महिलेचे पती रावसाहेब यांनी पत्नी आजारातून मुक्त झाली म्हणून पेढे वाटत वॉर्डाला स्टेशनरी भेट दिली. यावेळी डॉ. रोहन पाटील, डॉ. उमेश जाधव उपस्थित होते. उपचारासाठी वॉर्ड इन्चार्ज सिस्टर रोजमेरी वळवी, रत्नप्रभा पालीवाल यांच्यासह इतर परिचारिका, कक्षसेवक यांनी सहकार्य केले.