<
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघा महिलांचे वाचले प्राण
जळगाव : पोटात दोन गर्भाशय…एक अविकसित… त्यातही गर्भ राहिल्याने महिलेची प्रकृती धोकादायक झाली… कोणतेही रुग्णालय दाखल करेना…अशातच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दाखल करून शस्त्रक्रिया करीत जीव वाचविला. याशिवाय एका एचआयव्हीबाधित महिलेचा हिमोग्लोबिन कमी झाल्याने तिचा जीव धोक्यात होता. मात्र तत्काळ औषधोपचार सुरु केल्यामुळे या निराधार असलेल्या महिलेचा जीव वाचला. दोन्ही महिला रुग्णांना सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते साडी, लोहवाढीच्या गोळ्या, मिठाई व पौष्टिक आहार देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
पिंपळगाव तांडा ता. जामनेर येथील २३ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने तसेच यापूर्वी दोनवेळा गर्भपात झाल्याने या महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. अनेक खाजगी रुग्णालयांनी उपचार होणार नाही म्हणून दाखल करून घेतले नाही. अखेर १६ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. येथे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली.
यात महिलेच्या पोटात दोन गर्भाशय दिसून आले. पैकी एक अविकसित होता. त्यात गर्भ राहिल्याने आणि तोही तुटलेल्या स्थितीत असल्याने तिचा जीव धोक्यात होता. यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून अविकसित गर्भाशय व तुटलेला गर्भ काढून महिलेला निगराणीखाली ठेवले. आता हि महिला बरी झाल्याने सोमवारी २३ रोजी तिला औषधी, साडी, पौष्टिक आहार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्यासह स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागातील डॉ. श्रद्धा पाटील, डॉ.प्रदीप पुंड, डॉ.सोनाली मुपाडे, डॉ.सुधीर पवनकर, डॉ.कोमल तुपसागर, डॉ. संजीवनी अनेराय, डॉ. चंदन महाजन, डॉ. शीतल ताटे, डॉ. हेमंत पाटील या डॉक्टर्ससह परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
दोघा बहिणींचा जगण्यासाठी संघर्ष अन् रुग्णालयाची साथ !
रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी अविवाहित दोन बहिणींचा संघर्ष वेदनादायी आहे. त्यांना आई-वडिलांचे छत्र नाही. दोघांनाही एचआयव्ही आजाराची बाधा आहे. तसेच सांभाळणारे कोणी नाही. त्या एकमेकींना आधार देत जीवन जगत आहेत. जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रातून त्यांना शिवण मशीन देऊन उत्पन्न मिळविण्यासाठी पूर्वी मदत देण्यात आली आहे. अशातच ११ ऑगस्ट रोजी दोघींपैकी मोठ्या बहिणीची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला दुसऱ्या बहिणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तिची रक्ततपासणी केली असता हिमोग्लोबिन १. ४ इतका कमी निघाला. त्यामुळे तत्काळ उपचार सुरु करून ५ रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. महिलेस आज दि. २३ ऑगस्ट रोजी बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. प्रसंगी तिच्या बहिणीचीदेखील तपासणी केली असता हिमोग्लोबिन ४ इतका कमी निघाला. तिलाही उपचारासाठी दाखल केलेले आहे. डिसचार्ज देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका उपस्थित होते.
डॉक्टरचे असेही दातृत्व
दरम्यान एचआयव्ही बाधित बहिणींची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत म्हणून रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागातील डॉ. सुधीर पवनकर यांनी त्यांचे आजोबा गणेश नारायणराव लिचडे, रा. गोंदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख रक्कम देत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या या कृतीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले.