<
मुंबई दि.24 : माथेरान येथील योजनेतील ग्राहकांच्या पाणीपुरवठा देयकांकरिता अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. माथेरान पाणीपुरवठा देयकासंदर्भात मंत्रालयात श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
माथेरान येथील प्रलंबित पाणीपुरवठा देयकांवरील व्याजात सवलत देण्यासाठी व योजनेच्या ग्राहकांना पाणीपुरवठा देयके भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे श्री.पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे येथील मुख्य अभियंत्यांनी पुढील आठवड्यात प्रत्यक्ष माथेरानला जाऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी करावी असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी दिले.त्यांच्या भेटीनंतर आपण स्वतः पुढील महिन्यात या योजनेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माथेरानच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रेरणा सावंत,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर,पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणेचे मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे,कार्यकारी अभियंता विजय सूर्यवंशी,माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.