<
मुंबई(प्रतिनिधी)- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणाऱया भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही ‘विद्युत दाहिनी’ चे ‘नैसर्गिक वायू दाहिनी’ (PNG) मध्ये रुपांतर करण्यासह संरचनात्मक दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे एप्रिल २०२२ पर्यंत भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी सेवा बंद राहणार आहे.
तथापि, भोईवाडा स्मशानभूमीतील पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार आहे. तसेच विद्युत दाहिनीसाठी लगतच्या दादर (पश्चिम), शीव, रे रोड स्मशानभूमीचा पर्याय उपलब्ध असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. भोईवाड्यातील स्मशानभूमीत पूर्वी पारंपारिक पद्धतीनेच लाकडावर आधारित अंत्यसंस्कार होत होते. पर्यावरणपूरक सेवांचा विचार करुन महानगरपालिकेने अंदाजे १५ वर्षापूर्वी तिथे २ विद्युत दाहिन्या सुरु केल्या. अंत्यसंस्कार करण्यासाठी या विद्युत दाहिन्या सकाळपासून सुरु कराव्या लागतात. तसेच धुरांड्यातून धूर थेट बाहेर पडतो. तसेच विद्युत दाहिनीचे संचालन करणाऱया कर्मचाऱयांनाही काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व अडथळ्यांचा महानगरपालिकेने सखोल अभ्यास करुन अधिक पर्यावरणस्नेही असलेली व नलिकांद्वारे उपलब्ध होणाऱया नैसर्गिक वायू (Pipe Natural Gas) आधारित दाहिनीमध्ये या विद्युत दाहिन्यांचे रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, सोबत ध्वनिप्रदूषण संपुष्टात येईल. तसेच वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यासमवेत, स्मशानभूमीमध्ये कार्यरत कर्मचाऱयांनाही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागणार नाही. सदर वायू दाहिनीसाठी महानगर गॅस यांचेद्वारे सहज, सुलभरितीने पुरवठा होणार आहे. या नैसर्गिक वायू दाहिनी सेवेमुळे भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीवर होणारा वार्षिक सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. तसेच परिरक्षणाचा खर्चही कमी होईल. विद्युत दाहिनीच्या तुलनेत वायू दाहिनी ही अधिक पर्यावरणस्नेही असणार आहे. भोईवाडा स्मशानभूमीतील वायू दाहिनी उपलब्ध होईपर्यंत, विद्युत दाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या तीन स्मशानभूमींमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात चांदणेवाडी हिंदू स्मशानभूमी, चैत्यभूमीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), दादर (पश्चिम); शीव येथील शीव हिंदू स्मशानभूमी, शीव रुग्णालय प्रवेशद्वार क्रमांक ७ समोर, भाऊदाजी मार्ग, शीव आणि रे रोड येथील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ब्रिटानिया कंपनीसमोर, दारुखाना, रे रोड (पूर्व) यांचा पर्याय उपलब्ध आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.