<
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन जळगांव व गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार, २९ ऑगस्ट रोजी क्रिडा दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील खेळाडुंंचा गौरव देखील करण्यात येणार आहे. यामध्ये ५० क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच ६ क्रीडा शिक्षकांना क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ४ गट तयार करण्यात आले. यात खासगी इंग्लिश मिडीयम शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, उच्चमाध्यमिक(ज्यू.कॉलेज) महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय असा समावेश असेल. गणपत संभाजी पोळ (सर), राधेश्याम माधवलाल कोगटा, डॉ. प्रदीप प्रभाकर तळवेलकर, विष्णू रामदास भंगाळे, प्रोफेसर डॉ. किशोर पंडितराव पाठक, मिर्झा इकबाल बेग उस्मान बेग यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ४४ क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ रोड, एम. आय. डी. सी. जळगाव. येथे २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.
या जिल्हा क्रीडा पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील व क्रीडा संचालक प्रा. डॉ. आसिफ खान उपस्थित राहणार आहे.