<
मी धनराज महादेव रहिले आसोली, जि.गोंदिया येथील शेतकरी. माझ्याकडे पावणे चार एकर (3.75 एकर) शेती आहे. नैसर्गिक संकटे आणि अडीअडचणींमुळे शेती करणे जिकीरीचे झाले आहे. शेतीच्या कामांसाठी नेहमी कर्ज घ्यावे लागते. आर्थिक जुळवा-जुळव करत असताना घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होत असे. मी शेतीकरीता सन 2017 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोंदिया या बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतीमध्ये नापिकी झाल्यामुळे मी घेतलेले कर्ज भरु शकलो नाही. त्यामुळे माझे कर्ज थकीत राहिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली आणि दुसऱ्या यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झाले. त्यामुळे माझे थकीत असलेले 24 हजार 98 रुपये कर्ज माफ झाले. शासनाने मला कर्जमुक्त केले.
त्यामुळे मी आता अधिक जोमाने शेतीकडे वळालो आहे. या योजनेचा मला लाभ झाला. सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्यावरील कर्ज फेडणे अत्यंत जिकीरीचे असते. ही काळजी सरकारने दूर केली. त्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे.