<
जळगाव – इलाज करुन आजार बरा करण्यापेक्षा आजार होवू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजल्यास निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी शासनाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान महत्वपूर्ण ठरेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय, जळगाव, राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र शासनमार्फत आयोजित आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, डॉ. चांडक, महाजन, चिरमाडे, गाजरे आदि चिकित्सक, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध आजारांचे निदान व इलाजासाठी ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नागरीकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. बेटी बचाव, बेटी पढाव या अभियांनातंर्गत जिल्ह्याने चांगले काम केल्याने मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होवून मुलींचा जन्मदर 1 हजाराच्या तुलनेत 825 वरून 925 असा झाला आहे. या कामात सातत्य ठेवल्यास लवकरच मुलगा-मुलगी असा भेदा-भेद संपण्यास मदत होईल. आरोग्य विभाग, आरोग्य विभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी आप-आपसात समन्वय ठेवून आरोग्याविषयक सुविधांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानास जिल्हा आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या आवाहनाला साथ देत जिल्ह्यातील नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्याने मुलींच्या दरात लक्षणीय वाढ होवून जळगाव जिल्हा देशातील पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. जिल्ह्यात 26 ते 29 ऑगस्ट चार दिवसीय राष्टीय आरोग्य शिबीरात तपासणीस आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होवून सर्व तज्ञ डॉक्टरकडून तपासणी, इलाज व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया सुध्दा केल्या जाणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेकडून होत असलेल्या तंबाखूजन्य मिशिरीचा दात घासण्यसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना अशा लोकोपायोगी योजनांचा माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, डॉ. चांडक यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी तर आभार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डी. एस. पाटोडे यांनी मानले.