<
मुंबई(प्रतिनिधी)- योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व उत्तमपणे राहण्यास मदत होईल. योगाचे विविध प्रकार व तंत्र आत्मसात करण्यासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज डॉ. प्रज्ञा पाटील लिखित ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्यासह सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. पवार म्हणाले, योगविद्येच्या प्रसारासाठी उपयुक्त अशा या पुस्तकाचे इंग्रजी व हिंदीमध्ये भाषांतर केल्यास जास्तीत जास्त वाचकांना याचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करता येईल, असा सल्ला या पुस्तकास शुभेच्छा देताना श्री. पवार यांनी दिला.यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, सर्वसामान्याला परवडेल असा योग हा व्यायाम प्रकार असून याच्या नियमित साधनेने अनेक शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते.
प्राणायाम व योगासनामुळे श्वसन संस्थेतील सर्व इंद्रियांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होते. त्यामुळे सर्वानी आपल्या दैनंदिन आयुष्यात योगासने करावी. सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी या पुस्तकाचा नक्कीच हातभार लागेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतत 103 तास योग करण्याचा विक्रम केलेल्या डॉ. प्रज्ञा पाटील लिखित ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकात प्राणायाम करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, प्राणायाम साधना कशी करावी, प्रकृती नुसार प्राणायाम, विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठीची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.