<
महाराष्ट्र – राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.
या यात्रेतील पाथर्डी येथील सभेत बोलताना फडणवीस यांनी ‘आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या. मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण पुढील २५ वर्षे आम्हीच सत्तेवर राहाणार आहोत. १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरीही पाहिली. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. ईव्हीएममुळे हरलो असा आरोप ते करतात. मात्र ईव्हीएममुळे नव्हे तर त्यांना जनतेने हरविले असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी ‘विरोधी पक्षांची अवस्था बुद्धू पोरांसारखी झाली आहे. अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून कारणे द्यायची. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात असं विधान केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या सभेला जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. त्यात बबनराव पाचपुते, दिलीप गांधी, मोनिका राजळे, राम शिंदे हे नेते उपस्थित होते. त्यामुळे या नेत्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.