<
जळगाव(प्रतिनिधी)- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात खुब्याच्या सांध्यावर कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेआधी व्यवस्थित चालू न शकणार्या रुग्णास आता शस्त्रक्रियेनंतर चालता येत आहे. बुलढाणा येथील ३४ वर्षीय रुग्णाचे गेल्या तीन वर्षांपासून खुब्याच्या दोन्ही सांध्यांचे बॉल खराब झाले होते. रुग्णाने आत्तापर्यंत तीन ते चार दवाखान्यांमध्ये उपचार घेतले होते आणि दोन ऑपरेशन करूनही दुखणे कमी होत नव्हते. सर्व प्रकारच्या तपासण्या व बरेच उपचार करूनही काहीही फायदा होत नव्हता. रुग्णास चालणेही अशक्य झाले होते त्यामुळे रोजचे काम करणेही शक्य नव्हते. रुग्णाने आतापर्यंत ज्या ज्या दवाखान्यात उपचार घेतले होते तेथील डॉक्टरांनी रुग्णाला मुंबई किंवा पुणे येथे जाऊन पुढील शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रुग्णाला मुंबई पुणे येथील मोठ्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आल्यानंतर रुग्णाला अस्थि शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी तपासून रुग्णाने आधी घेतलेल्या सर्व उपचारांचा संपुर्ण आढावा घेतला.
गरजेच्या असलेल्या सर्व तपासण्या केल्या नंतर कृत्रिम सांधेरोपण म्हणजेच टोटल हिप रिप्लेसमेंट(ढकठ) या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सदरील शस्त्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची व जोखमेची आहे. अस्थिव्यंगशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांच्या टीमने आपले सर्व कौशल्य पणाला लावून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम आहे व दुखणेही कमी झाले आहे तसेच रुग्ण स्वतः व्यवस्थितपणे चालत आहे. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांच्या इच्छाशक्तीला रुग्णाचे सहकार्य लाभल्यास गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या जाऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणार्या डॉक्टरांच्या टीममध्ये पथक प्रमुख डॉ. प्रमोद सारकेलवाड(अस्थिव्यंगशल्य तथा कृत्रिम सांधेरोपण तज्ञ), डॉ. शितल फेगडे (भुलतज्ञ), डॉ. ऋतुराज काकड(भूलतज्ञ), डॉ. परीक्षित पाटील, डॉ. सुनीत वेलणकर, डॉ. राहुल जनबंधू, डॉ. हर्षा देशपांडे, डॉ. शिवाजी, डॉ. विजया, डॉ. रश्मी, डॉ. रुएल, डॉ. हर्षद, डॉ. परीरा, डॉ. रवनीत, डॉ. अमार, निलेश ब्रदर, विजया सिस्टर, अकिन ब्रदर, आकाश ब्रदर हे सर्व होते. या सर्वांच्या विशेष प्रयत्नांती ही मोठी व जोखमेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या प्रसंगी डॉ. दीपक अग्रवाल (अस्थीव्यंगशल्यतज्ञ व कृत्रिम सांधेरोपण तज्ञ), डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष- गोदावरी फाउंडेशन), डॉ.एन एस आर्वीकर(अधिष्ठाता), प्रमोद भिरूड ( रजिस्ट्रार) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.