एरंडोल(प्रतिनिधी)- एरंडोल हे तालुक्याचे शहर मुंबई ते नागपूर महामार्गावर आहे, या मार्गावरुन जळगाव व धुळे – मुंबई साठी मोठी वर्दळ असते, या मार्गावरुन जाणाऱ्या तमाम रुग्ण वाहिकांच्या चालक व त्यातील रुग्णांना एरंडोल शहरातील युवा आरोग्य दूत व ॲम्ब्युलन्स चालक विक्की खोकरे यांनी मोफत जेवण देणेचा उपक्रम सुरु केला आहे,या कृतीचे तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.
एखाद्या व्यक्तीची अचानक तब्येत बिघडली, किंवा अचानक अपघात झाला,किंवा प्रसववेदना असह्य झाल्या की, त्वरित ॲम्ब्युलन्स बोलावण्यात येते, तो चालक आहे त्यास्थीतीत घटनेचे गांभीर्य पाहून इच्छीत स्थळी पोहचतो,त्यावेळी वेळ कोणतीही असू शकते, जेवण झाले असेल किंवा नसेल तरी देखील विक्की स्वतः रुग्णवाहिका चालक असल्याने त्याला हा मोठा अनुभव आहे, हीच बाब त्याला सतत बेचैन करीत असल्याने त्याने हा धाडशी व जनसामान्यांचा विचार करुन स्वखर्चाने अशा लोकांना जेवण देणेचा उपक्रम सुरु केला आहे. एरंडोल शहरातून जाणाऱ्या कोणत्याही ॲम्ब्युलन्स गाडीच्या चालकाला व त्यातील रुग्णांना तो पदरमोड करुन जेवण पूरवणार आहे. गरजूंनी त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, यासाठी त्याने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६१७५४८६ हा सार्वजनिक केलेला आहे.जळगाव, नागपूर, जाणारे अथवा मुंबई, नासिक, धुळे,पुणे वा कोणत्याही ठिकाणी या मार्गावरुन जाणारे रुग्णवाहिका चालकांनी एरंडोल पोहचण्याच्या काही वेळ आधी विक्कीशी संपर्क करावा,जेवण तयार मिळेल असे विक्की व त्यांच्या परिवाराने विनंती केली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात, स्वतःसाठीच जगू पहाणार्या स्वार्थी मनोवृत्तीत जनभावना जोपासणारा,जेमतेम उत्पन्न असणारा पण मनाने गर्भश्रीमंत असणारा तरुण ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एकचक्रनगरीत म्हणजे आजच्या एरंडोल शहरात आहे, ही निश्चितच शहरवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे.