<
जळगांव(चेतन निंबोळकर)- कुंभार समाजाचा वीट व्यवसाय हा वंशपरंपरागत असल्याने शासनाने आम्हाला 500ब्रास माती स्वामीत्व धनातून वगळण्यात आली आहे. आमचा व्यवसाय हा अल्पकालावधीचा आहे. शासनाने सुरु केलेले ऑनलाईन महाखनिज संगणकीय कार्यप्रणालीमध्ये कुंभार समाजाला येणाऱ्या अनंत अडचणी आहे. तसेच वीट भट्टी व्यावसायिकांना व्यवसाय चालविण्यासाठी करार पद्धतीने घ्यावी लागते. कुंभार समाज हा आर्थिक मागासलेला असून त्यांच्या जवळ स्वतःचे वाहन नसते, त्यांना ते भाडे तत्वावर घ्यावे लागते. सदर व्यवसाय हा ग्रामीण भागात असल्याने कच्चे रस्ते, मातीची उपलब्धता, ग्रामपंचायत सदस्यांचा त्रास, वारंवार पैशाची मागणी, स्थानिक नेत्यांची आडमुठे धोरण, अशा या अनंत अडचणीत बरेच दिवस वाया जातात. संगणकीय कार्यप्रणालीमध्ये दिवसांची कालमर्यादा ठरवून दिली असते. विटभट्टी ज्या परिसरात असते त्या परिसरात नेटवर्क उपलब्ध नसल्याने ओटीपी येणे, गुगल मॅप सेंड करणे हे शक्य होत नाही. त्यातच कुंभार हा अशिक्षित असल्याने या अँप चा वापर करणे कुंभार समाजाला शक्यच नाही.
या अडचणीचा विचार करुन कुंभार समाजाला 500 ब्रास माती परवाना पत्रक (फ्री पास) एकाच वेळेस देऊन शासकीय पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांचा कामाचा व्याप कमी करावा व अशिक्षित कुंभार समाजाला योग्य तो न्याय द्यावा, अश्या आशयाचं निवेदन जिल्हा वीट उद्योजक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महाखनिज अँप कार्यप्रणाली मध्ये 16 रुपये 52 पैसे प्रतिब्रास प्रमाणे सिस्टीम चार्ज आकरण्यात येतो. 500 ब्रासचे 8260/- व इतर खर्चासह 10,000/- रुपये हे गरीब व्यवसायिकाला भुर्दंड आहे. त्यामुळे आमचे फ्री पासचे परमिट हे तहसीलदार स्तरावर मिळावे. असे देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी बोलण्यात आले. निवेदन देताना कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, उपाध्यक्ष सुभाष पंडित, सचिव सखाराम मोरे, वीट उद्योग आघाडी उपाध्यक्ष छोटू कुंभार, जळगाव प्रतिनिधी अशोक पंडित, धरणगाव प्रतिनिधी देविदास कुंभार, उपाध्यक्ष सुकलाल कुंभार, पिंप्राळा उपाध्यक्ष धनराज कुंभार, नारायण कुंभार(भालोद)हे बांधव उपस्थित होते.