<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी मोहिम स्तरावर जनजागृती करून उर्वरित लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. आज येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांताधिकारी सोपान कासार, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली पाटील, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाडचे उपअभियंता श्री. अर्जुन गोसावी, शाखा अभियंता श्री. गणेश चौधरी, मुकेश पवार, हितेश मोरे, सहायक अभियंता सागर चौधरी, उमेश पाटील, येवला शहर पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे आदी उपस्थित होते.पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील काही प्रमाणात वाढत्या रूग्णसंख्येच्या अनुषंगाने लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये याविषयीची जनजागृती होणे आवश्यक आहे.
आरोग्य यंत्रणांनी लसीरकणाच्या जनजागृतीसाठी फिरते वाहन, दर्शनी फलक तसेच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.येवला तालुक्यातील वाढत्या रूग्णसंख्येची निश्चित कारणे शोधुन त्यावर आवश्यक उपायोजना करण्यात याव्यात. तसेच रूग्णालयात कोविडबाधित रूग्णास भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी कमी करावी व त्यावर निर्बंध आणावेत, त्यामुळे निश्चितच रूग्णवाढीस अटकाव होण्यास मदत होईल. येवला शासकीय रूग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लाँट कार्यान्वित झाला असून, लिक्वीड ऑक्सिजनसाठी 13 हजार लिटर क्षमतेचा बसविण्यात आलेला टँक त्वरीत भरून सज्ज ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.गणेशोत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही तसेच गर्दी वाढणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा व नगरपालिका विभाग यांनी सतर्क रहावे. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केल्यास अनावश्यक गर्दी टाळता येणे शक्य आहे. नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे व शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाणपूल, विंचूर आयुर्वेदिक दवाखाना, पाटोदा आरोग्य केंद्र, निमगाव वाकडा आरोग्य केंद्र, तसेच महालखेडा, सावरगाव, ममदापूर मेळाचा बंधारा कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.