<
डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन
जळगांव(प्रतिनिधी)- “दर्जेदार वाचन शिक्षक व विद्यार्थी दोघांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीला समृद्ध करते” असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले. शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने शिक्षण महर्षी डॉ.जे. पी. नाईक व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने शिक्षकदिन दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित ऑन लाईन व्याख्यानात “शिक्षकांनी काय वाचावं? विद्यार्थ्यांपर्यंत ते कस पोहोचवावं” या विषयानुषंगे मार्गदर्शन करतांना साहित्यिक चंद्रकांत भंडारी बोलत होते.
वेळेच भानं व कोरोना निर्बंधाची जाणं ठेवून अध्यक्ष व प्रमुख अतिथीविना हा अनोखा प्रयोग ! मार्गदर्शनात भंडारी पुढे म्हणाले की, दर्जेदार ग्रंथवाचना एवढेच वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचनाने ताजे व वैविध्यपूर्ण विषयांमुळे सामाजिक मूल्यांचे भान व कर्तव्याची जाण येऊन वाड़मयीन अभिरुची वाढते. ज्ञानरचनावादी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील सृजनशील शिक्षक व प्रयोगशील शाळांची त्यांनी सोदाहरण माहिती दिली. तंत्रस्नेही शिक्षकांना सुद्धा आपल्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्तीसाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशील भावनांचं वादळ समजून घेण्यासाठी वाचन करावं. विषयांतील सखोल ज्ञान व अध्यापन शास्त्रातील कौशल्य विकसित होण्यासाठी शिक्षक अपडेट व ॲडव्हान्स वाचन करीत नाहीत याची खंतही त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत भंडारी यांनी मुंबईच्या लोकल प्रवासात जपलेलं पुस्तक वाचन वेड आणि हायस्कूल मध्ये साहित्यिक पु.ल.देशपांडे, भालचंद्र नेमाडे, शांता शेळके, शिरीष पै, शायर हरीवंशराय बच्चन यांच्याशी विद्यार्थ्यांशी भेट, प्रत्यक्ष वर्गात अध्यापन आणि सुसंवाद अशा अनोख्या प्रयोगातील गंमती जमतीसह किस्से सांगितले. विद्यार्थी उत्स्फूर्तपुर्ण वाचनाभिमुख व्हावे यासाठी कवी अशोक कोतवाल व अशोक कोळी यांनी राबविलेले अप्रतिम उपक्रमही सांगितले. प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी भंडारी सरांचा साहित्यिक प्रवास व के.सी. ई. सोसायटी समन्वयक म्हणून केलेले विद्यार्थी व पालक यांच्या संदर्भातील विशेष प्रबोधनपर उपक्रम परिचयात सांगितले.
भिशीतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्याने लुल्हे यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन चंदकांत भंडारी यांचा भावपूर्ण सत्कार केला. आभार प्रदर्शन तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी केले. व्याख्यानास अंनिस ज्येष्ठ कार्यकर्ते डिगंबर कट्यारे व शिरीष चौधरी, सुप्रसिद्ध लेखक राजेंद्र पारे, डायेटचे किशोर पाटील, हर्षवर्धन भंडारी, सुनिता भंडारी, डॉ.विजय बागूल, उषा सोनार, गजश्री पाटील, सुजाता निकम, वंदना वानखेडे, अरुण पाटील, श्रीकांत मोटे, अथर्व गुरव, बाळू पाटील यांचेसह ग्रंथप्रेमी शिक्षक व रसिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.