<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना पाचोरा भडगाव तालुक्याचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते आदर्श क्रियाशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. प्रभावी व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय, कुशाग्र, विद्यार्थीप्रीय शिक्षक म्हणून ओळख असलेले प्रभाकर सुकलाल सिनकर गेल्या 29 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण सामनेर येथे पूर्ण केले तर डी. एड. खिरोदा येथील महाविद्यालयात पूर्ण केले. श्री. सिनकर हे सन 1991 पासून नोकरीत रुजू झाले आहेत. त्यांनी आजवर काळखेडा ता.जामनेर, सावखेडा ता. पाचोरा, लासगाव ता. पाचोरा, माहेजी ता. पाचोरा, पुनगाव ता. पाचोरा, ओझर ता. पाचोरा, बांबरुड बु ता. भडगाव, भातखंडे बु ता. भडगाव या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले. आजवर असंख्य सुसंस्कारित विद्यार्थी त्यांनी घडविले तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर आहेत, अनेक विद्यार्थी पोलीस, आर्मी व प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांनी हा पुरस्कार पाचोरा भडगाव मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक स्वीकारला. यावेळी भडगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती अर्चनाताई विशाल पाटील, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, सर्व केंद्रप्रमुख, विशाल पाटील अध्यक्ष माताजी ट्रस्ट चाळीसगाव, भडगाव तालुका शिक्षक संघाचे सर्व अध्यक्ष, आधी मान्यवर उपस्थितीत होते.विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक, मित्र परिवार त्यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा देत आहेत.