<
राज्यस्तरीय कोविड प्रशिक्षणाचे उदघाटन
जळगाव(चेतन निंबोळकर)- पुढील काळात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची संभावना पाहता दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने एक मार्गदर्शिका तयार करून डॉक्टर आणि परिचारिका यांचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली आहे. कोरोना महामारी थांबविण्यासाठी प्रशिक्षण महत्वाची भूमिका बजावणार असून यामुळे कोरोना महामारीची तिसरी लाट लवकर थोपवू शकू असा आत्मविश्वास डॉक्टरांमध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोनदिवसीय कोविड -१९ प्रशिक्षण दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. त्याचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, कोरोना थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्न केले. विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली. आता संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी दुर्लक्ष न करता कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मास्क, स्वच्छता, अंतर हि त्रिसूत्री कायम लक्षात ठेवावी, असेही ते म्हणाले.
डॉ. पोटोडे म्हणाले की, कोरोना महामारी पळवून लावण्यासाठी जिल्हाधिकारी टीम, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय टीम यांनी यश मिळविले. १ लाख ४० हजार ११८ रुग्ण आपण बरे करून दिलासा दिला आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण दिशा निर्देश देते, असेही ते म्हणाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याशाखा सदस्य जयश्री दंडगव्हाळ, सुनील शिंदे, कार्यक्रम सहाय्यक योगेश वाणी परिश्रम घेत आहे.