<
जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह एसएमएस संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत श्रमदान करून अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. हे श्रमदान महाविद्यालयाच्या आवारात मध्यवर्ती ग्रंथालय तथा दिव्यांग बोर्डाच्या परिसरात करण्यात आले.
खडबडीत झालेली जागा तसेच पावसामुळे तुंबलेले पाणी यावर परिसरातील खडी, मातीचा वापर करून सपाटीकरण करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ग्रंथालय आहे. या ठिकाणी दिव्यांग मंडळाचे दर बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी कामकाज चालते. तसेच विद्यार्थ्यांसाठी अध्ययन करण्यासाठी ग्रंथालय खुले करण्यात आले आहे. येथील परिसरात पावसामुळे पाणी साचणे तसेच खडबडीत जागा, चालायला व्यवस्थित जागा नाही अशी परिस्थिती होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह श्रमदान करून परिसराचे सपाटीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह ७ ते १० या वेळेत श्रमदान केले. सकाळपासून पेव्हर ब्लॉक एका जागी जमा करणे, त्यात माती भरणे, पावसाच्या साचलेल्या पाण्यात खडी टाकून त्यावर मातीचा भराव देणे, तसेच मागील बाजूस बांधकामाचा कच्चा टिकाऊ भराव टाकून साचलेले पाणी बंद केले. तसेच गवत काढून टाकून परिसर प्रसन्न व चैतन्यमयी केला. याकामी महाविद्यालय व रुग्णालयातील एसएमएस संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
या श्रमदानात स्वतः अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. इम्रान तेली, डॉ. संदीप पटेल, डॉ. वैभव सोनार, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. अलोक यादव यांच्यासह जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदचे जनरल सचिव तेजस शिंदे, एसएमएस संस्थेचे अजय जाधव यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी यांनी श्रमदानात सहभाग घेतला.