<
जळगांव(चेतन निंबोळकर)- शिक्षक दिन कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनानिमित्त क्रीडा, नृत्य, साहित्य, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांना रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर असून प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते मनोज गोविंदवार, भारतीय राष्ट्रिय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. राहूल वाकलकर, जिल्हाध्यक्ष अनिल बाविसकर, जिल्हा समन्वयक राहूल पाटील व धनश्री ठाकरे, तालुकाध्यक्ष तुषार विसपुते मान्यवर उपस्थित होते. विजय लुल्हे शिक्षण दिनानिमित्त (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन) विविध क्षेत्रातील कतृत्ववान महिलांना समारंभपूर्वक पुरस्कृत करतात. महिलांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करुन आदर्श मातांचा सत्कार करतात. लुल्हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कायकर्ते असून समाजप्रबोधनार्थ प्रात्यक्षिकांसह व्याख्याने व विविध स्पर्धांच्या आयोजनातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवितात. प्रसंगी बुवाबाजी भंडाफोड, धरणे – आंदोलनात सक्रीय सहभागी होतात. समाजातील कला, क्रीडा, नृत्यक्षेत्रात नावलौकिक प्राप्त कलावंतांच्या मुलाखती दैनिकांतून प्रसिद्ध करणे, प्रसंगोपात्त गौरवपर लेख लिहिणे, चित्रकला प्रदर्शनांचे आयोजन, कलावंतांना व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करणे कार्यक्रम स्वखर्चाने उत्साहाने राबवितात.
मुक्त पत्रकारीकेतून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक समस्यांचे निर्मूलन केले. दीनदलीत आदिवासी बालकांना दीवाळी फराळ व कपडे वाटप, राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांचे भित्तीफलक लेखनातून विचार जागर, लोकसहभागातून शाळांना समाजसुधारकांची चरित्रात्मक पुस्तके भेट, डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार, सार्वजनिक परिसर स्वच्छता, मरणोतर नेत्रदान व देहदान संकल्पासाठी तसेच ” मधुमेह एक जीवनसाथी” चित्र प्रदर्शनान्वये समाज प्रबोधन करीत आहेत. कोविड महामारी काळात स्थलांतरीत मजुरांना फलाहार व अन्नदान, विद्यार्थ्यांना व सफाई कामगार महिलांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, वयोवृद्धांना वाफ घेण्याचे मशिन वाटप आदी विशेष कार्यक्रम सेवार्थ राबवले. शासनमान्य मोफत वाचनालय चालविणे, शिक्षकांसाठी पुस्तक भिशी, ना नफा ना तोटा तत्वावर वाचनीय दर्जेदार पुस्तके घरोघरी पोहोचविणे, सुदृढ आरोग्य संपन्नतेसाठी मासिकांचे विना कमिशन वर्गणीदार करणे ध्येयवेडाने सानंद करतात.
पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा , विसर्जीत गणपती दान करणे, निर्माल्य संकलन, संदेशपर राख्या बनवणे, फटाकेमुक्त दिवाळी अभियान, पर्यावरणपूरक सार्वजनिक होळी, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, “त्सुनामी मृत्यु तांडव” चित्र प्रदर्शनी, वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन, संविधान परीक्षा, रंगभरण चित्रकला स्पर्धा व संस्कार परीक्षांचे आयोजन, विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून स्मृतिचिन्हे देऊन सत्कार समारंभ असे अनेकविध उपक्रम राबवित असतात. कारगिल शहिदांच्या कुटूंबियांसाठी व गुजराथ भुकंपग्रस्तांसाठी मदतनिधी, कुटूंब नियोजन राष्ट्रीय कार्यात ग्रामीण भागात नेतृत्वाने राबविले आहेत. या समग्र निर्लेप अराजकीय समाजोन्नतीपर उल्लेखनीय कामाची दखल घेत शिक्षक विजय लुल्हे यांना सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी लुल्हे यांना अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या सन्मानाप्रित्यर्थ कवी, लेखक विजय लुल्हे यांच्यावर सर्व क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, आप्तेष्टांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.