<
जळगांव(प्रतिनिधी)- ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन शनिवार दि.11 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त असोसिएशनतर्फे देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड, वृध्दाश्रम तसेच अनाथालयांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात असे सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत पांडे यांनी दिली.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले की, देशात मोबाईल रिटेलर्स क्षेत्रात लाखो बांधव कार्यरत आहेत. व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही असोसिएशनने कायम जपली आहे. संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा करतानाही समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे निर्देश संस्थापक चेअरमन कैलाश लख्यानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ उपाध्यक्ष विभूती प्रसाद, राष्ट्रीय संयुक्त सचिव नवनीत पाठक यांनी दिले आहेत. संघटनेचे राष्ट्रीय सचिव भावेश सोळंकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार नगरसह संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल रिटेल विक्रेते रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहेत. मोबाईल रिटेलर्सचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने कायम महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: बहुराष्ट्रीय ई कॉमर्स कंपन्यांच्या चुकीच्या व्यापार धोरणाविरोधात सातत्याने आवाज उठवून सरकार दरबारी प्रश्न मांडले आहेत. हे करतानाच सामाजिक उत्तरदायित्त्वही निभावले पाहिजे या भावनेतून 11 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, गरजू संस्थांना मदत असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मोबाईल रिटेलर्सनी यात सहभागी होण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.
याच दिवशी सायंकाळी 5 वाजता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा ऑनलाईन माध्यमातून देशभरातील मोबाईल रिटेलर्सशी संवाद साधणार आहेत.