<
मालेगाव(उमाका वृत्तसेवा)- राज्य शासनामार्फत आदर्शगाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून राज्यामधून दर वर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते. सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडण्याची जिद्द प्रत्येक गावकऱ्यांने उराशी बाळगण्याचे आवाहन करतांनाच गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आदर्शगाव संकल्प योजना प्रेरक ठरेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
तालुक्यातील खडकी येथे विशेष ग्रामसभा व गावफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. प्रसंगी आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, गावच्या सरपंच आशा देवरे, उपसरपंच ज्योती देवरे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भिकन शेळके, अभय पाठक, कृषी उपसंचालक सुरेश भालेराव, तंत्र अधिकारी गणेश तांबे, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, ग्रामपंचायत सदस्य सुर्यप्रकाश देवरे, कारभारी जाधव, भारती चव्हाण, राधीका जाधव, आशा गायकवाड, देवकाबाई मगरे यांच्यासह प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडकी गावाचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर गावे देखील त्याचे अनुकरण करतील असा विश्वास व्यक्त करताना मंत्री श्री.भुसे म्हणाले, वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग या गावात असल्यामुळे नशा मुक्तीसाठी पोषक वातावरण मिळणार आहे. खडकी गावात लोकसहभागातून यापूर्वीच अभ्यासिका व व्यायामशाळा साकारण्यात आली आहेत. गावाच्या विकासासाठी अध्यात्माची जोड देण्यासोबतच भावी पिढीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध होणाऱ्या सोयीसुविधांवरही भर देण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यातही या गावाचा चांगला सहभाग आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन गावाचा नक्कीच विकास होईल असेही ते यावेळी म्हणाले.बोअरवेल, नसबंदी, तरुणांना रोजगार, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी क्रिडांगण, आरोग्य, शिक्षण, अभ्यासिका, पाणी अडविण्यापासून ते महिला बचतगटाच्या सक्षमीकरणापर्यंत ज्याकाही मागण्या आहेत त्या विविध विभागाच्या योजनांच्या माध्यमातून पुर्ण करण्याचा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे राज्यभरात कुठे कमी तर कुठे अधिक स्वरुपात पर्जन्यवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रावर महसूल व कृषी विभागाने विशेष लक्ष केंद्रीत करुन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या. तालुक्यातील पाइप बंद कालव्यामुळे सिंचन क्षेत्रात तीनपट क्षेत्रवाढ होईल, परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल असेही मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले.