<
पुणे(प्रतिनिधी)- राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच मराठवाडा, विदर्भात विजा, गडगडाटासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी तीव्रतेच्या वादळाची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.