<
जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना झालेल्या लाडक्या बाप्पाला आज जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी बाप्पाची महाविद्यालय परिसरातून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकही सहभागी झाले होते. शुक्रवारी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी नर्सिंग महाविद्यालयाचा गणेशोत्सव हा डो चे पारणे फेडणारा असतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी शासनाच्या आदेशानुसार नियमांचे पालन करून गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव काळात नर्सिंग महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
पाच दिवसाच्या प्रतिष्ठापनेनंतर आज बाप्पाची महाविद्यालय परिसरातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सुरवातीला बाप्पाची माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रवीण कोल्हे, यांच्यासह प्राध्यापक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.
बाप्पाची भव्य मिरवणूक आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनावरून बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. ढोल ताशांच्या तालावर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे कर्मचारी देखिल या मिरवणूकीत सहभागी झाले होते. नर्सिंग महाविद्यालयातर्फे निघालेल्या या विसर्जन मिरवणूकीने महाविद्यालयाचा परिसर चांगलाच दणाणून गेला होता.
अन् विद्यार्थी गहिवरले वर्षभरानंतर येणारा गणेशोत्सव हा एकोपा, आनंद घेऊन येत असतो. या काळात विद्यार्थी एकदिलाने बाप्पाच्या सेवेत कार्यरत असतात. मात्र पाचव्या दिवसानंतर बाप्पाला जसजशी निरोप देण्याची वेळ येते तसतसे विद्यार्थ्यांचे अंत:करण हे जड होते. विसर्जन मिरवणूकीनंतर लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत विद्यार्थ्यांना गहीवरून आले होते. फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे देखिल बाप्पाला आज निरोप देण्यात आला.