<
मुंबर्ई – राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांचा शिवसेना प्रवेश तूर्त लांबणीवर पडला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळं राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबीयांमध्ये चलबिचल झाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ’मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ते आजच शिवबंधन बांधून घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही. तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली.
अवधूत यांनी स्वत: या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. ’उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत ही चर्चा होती. पक्ष प्रवेशाबद्दल आज काहीही झालं नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेईन,’ असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.