<
पुणे(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतूराज पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.प्रभात रंजन, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक डॉ.नीरज व्यवहारे, ज्ञानशांती शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, समाजातील सर्व घटकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांचा हाच वारसा पुढे नेण्याचे काम त्यांच्या नंतरच्या दोन्ही पिढ्या सक्षमपणे करत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक तसेच शैक्षणिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्यामध्ये डॉ. डी. वाय.पाटील यांच्या नावाने असलेल्या या शैक्षणिक संकुलात नव्याने सुरू झालेली शाळा संस्कार शाळा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जपळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तीन लाखावर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडणे ही गौरवास्पद बाब असल्याचा उल्लेखही श्री.पवार यांनी केला.
निगडी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे वैभवात भर पडली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच छंद जोपासावा. जीवनात मोठे होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असावा. त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षित करावे. शैक्षणिक संस्थांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील उत्तम सुविधांचा लाभ समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संस्थेत एक लाख विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या संस्थेचा कायम प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते यावेळी ऑक्सीजन प्लांटचेही उद्घाटन झाले. तसेच श्री.पवार यांनी शैक्षणिक संकुलाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.