<
अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील सात्री येथील मयत प्रल्हाद दंगल पाटील यांनी आपल्या शेतातील बोअरवेल साठी तालुक्यातील वीज वितरण कंपनी मारवड शाखेत रीतसर अर्ज करत योग्य ती शासकीय फी तसेच डिमांड नोट भरले होते. तरी मयत प्रल्हाद पाटील यांच्या हयाती पासून अद्याप पावेतो शेतासाठी वीज मिळाली नसल्याचं प्रल्हाद पाटील यांचा मुलगा योगराज प्रल्हाद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या संदर्भात ते 15 ऑगस्ट 2021 रोजी अमळनेर प्रांतधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालया बाहेर उपोषणास बसणार होते. परंतु, मारवड शाखेतील वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्याने तुम्हाला वीज पुरवठा करण्याचे आदेश संबंधीतांना करतो, असे लेखी आश्वासन योगराज पाटील यांना दिले.परंतु, सदर शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, वरिष्ठानी आदेश केल्यावरही मला अद्याप पावेतो वीज मिळाली नाही. तसेच सदर शेतकरी पुढे बोलतांना म्हणाला की, मी मयत प्रल्हाद पाटील यांचा एकुलता एक मुलगा असून त्यांच्या निधनानंतर वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी विनंत्या केल्या. तरी मला संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्याने माझं ऐकून न घेता उलट मला कार्यालयाबाहेर हाकलून लावले. यामुळे ते अत्यंत नैराश्यात जाऊन शेवटी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडावी लागली.
तसेच या निवेदनावर देखील कारवाई न झाल्यास शेवटी जळगांव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर 8 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे देखील त्यांनी निवेदनात म्हटले आहे.