<
चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर खलाने यांचे मार्गदर्शन व सूचना
अमळनेर(प्रतिनिधी)- आपले गाव आपली जबाबदारी या तत्वानुसार प्रत्येक तरुणाने आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या गावाच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी घ्यायला पाहिजे जेणेकरून गावात घडणाऱ्या अनिष्ट घटनांचा आळा बसेल, असे प्रतिपादन मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी केले.
गेल्या आठवड्यात चौबारी गावात झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चौबारीत आयोजित सभेत खलाने यांनी मार्गदर्शन व सुचना केल्या. ते पुढे म्हणाले की, चौबारी गावात घडणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करून तरुणांनी सक्रिय व्हावे, गावाच्या सुरुक्षततेसाठी ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, बाहेरून आलेल्या संशयास्पद व्यक्तीबद्दल पोलिसांना कळवावे, गुरे चोरीला आळा घालण्यासाठी मुख्य रस्त्यावर गुरांना बांधू नये, आदी सुचना केल्या.
खलाने यांच्या सूचनांना प्रेरित होऊन गावातील ३० ते ३५ तरुण गावाच्या सुरुक्षततेसाठी पुढाकार घेत लागलीच ग्राम सुरक्षा दलात सहभागी झाले. यावेळी माजी सरपंच त्र्यंबक बिभीषण पाटील, मधुकर भास्कर पाटील, नाना शेणपडू पाटील, खुशाल महाजन, विठ्ठल पाटील, पोलीस पाटील भावना पाटील, ग्रा. प. सदस्य विजय पाटील, रवींद्र मोरे तसेच गावातील आबालवृद्ध उपस्थित होते.