<
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेले राष्ट्रीय पोषण अभियान शेमळदे येथे अभिरुची अंगणवाडीत राष्ट्रीय पोषम माह १ सप्टेंबर पासून दररोज विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.
१ सप्टेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दररोज एक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रभातफेरी, गृहभेटीद्वारे मार्गदर्शन, गणेशोत्सवमध्ये प्रचार रॅलीद्वारे प्रचार, पोषण आहार प्रात्यक्षिक, सॅम मॅम बालकांची, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, कोविड १९ चे लसीकरण , मुलांची व गरोदर मातांची वजन उंची घेणे, गरोदर माता व किशोरी मुलींचा HB व BMT काढणे, बेटीबचाव चे नारे , सेल्फी पॉईंट बनवून सेल्फी काढणे, अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी पूरक पोषण आहाराचे महत्व पर्यवेक्षिका कल्पना तायडे-कोसोदे यांनी सांगितले. गरोदर मातांची, स्तनदा मातांची, किशोरी मुलींची, ०-६ वर्षांच्या लाभार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा या सर्व बाबींविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व समारोप अंगणवाडी सेविका शालिनी सिंगणुरकर यांनी केले. यावेळी सरपंच मंगला पाटील, पवन पाटील, अंगणवाडी सेविका अर्चना जावरे, मदतनीस प्रमिला भालेराव, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.