<
जळगांव(प्रतिनिधी)- केंद्रीय लोकसेवा आयोगाची यु पी एस सी परीक्षा 2020 चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये एस एस बी टी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी खान असीम किफायत खान यांनी 558 वी रँक संपादन केली.
या परीक्षेत एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये महाराष्ट्राचा लक्षणीय सहभाग होता तब्बल 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. प्रथमपासूनच जिद्द आणि चिकाटी हे विशेष गुण खान असिफ यांच्या अंगी त्यांनी बाणवले होते . महाविद्यालयीन दिवसात सुद्धा शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी चालू केली होती.
महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असलेल्या अवांतर विषयांची पुस्तके व स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच महाविद्यालयातील व विभागातील शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपणास हे यश सहज संपादन करता आले असे खान असीम यांनी नमूद केले. 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम फेरीत त्यांची निवड झाली होती परंतु फार थोड्या फरकाने त्यांना यशाने हुलकावणी दिली अशाही परिस्थितीत निराश न होता आणि अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. जिद्द चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठ्या संख्येने यश संपादन करू शकतात असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
लोकसेवा आयोगाची स्वतः तयारी करत असताना त्यांनी इतर होतकरू विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलेले आहे. भविष्यात देखील हे कार्य आपण सुरू ठेवू असे त्यांनी सांगितले.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी उपप्राचार्य डॉ.एस.पी.शेखावत विभाग प्रमुख डॉ वी.आर. दिवरे व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खान असीम यांचे अभिनंदन केले.